Monday 16 October 2017

स्मार्ट पुणे

गेल्या महिन्यात बालगंधर्व कलादालन इथे मी काढलेले एक प्रकाशचित्र प्रदर्शित झाले होते हे वाचकांना आठवत असेलच. त्या प्रदर्शनासाठी मी पुण्यात असताना एकदा संभाजी बागेलगतच्या पदपथावरून जाताना त्या पदपथाच्या सुशोभीकरणाकडे लक्ष गेले आणि त्याची काही प्रकाशचित्रे घेतली. त्या बद्दल थोडेसे.........

पुणे शहराच्या सुशोभीकरणाचे बरेच प्रकल्प चालू आहेत. त्यातला हा एक पूर्ण झालेला प्रकल्प आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या जंगली महाराज रस्त्याकडील प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर डावीकडे डेक्कन जिमखान्याकडे वळले की लगेचच हा सुशोभित पदपथ लक्ष वेधून घेतो. सर्वात प्रथम नजर जाते ती या फलकाकडे ज्यावर या सुशोभीकरणाचे मानचित्र आहे. या चित्रात उजवीकडे संभाजी उद्यानाचे कुंपण दिसते ज्याला धरून हे सुशोभीकरण केले आहे. त्यानंतर जंगली महाराज रास्ता आहे आणि डावीकडे असाच सुशोभित केलेला पदपथ आणि बाजूच्या व्यावसायिक इमारती दिसतात. संभाजी उद्यानाच्या समोरील बाजूचे काम चालू आहे, तर संभाजी उद्याना लगतच्या पदपथाचे काम पूर्ण झाले आहे. 

पदपथ सुशिभिकरणाचे मानचित्र

संपूर्ण पदपथावर नक्षीदार लोखंडी कमानी बसवल्या आहेत. लांबून पाहिले तर संपूर्ण पदपथ या कमानी आणि झाडांच्या सावलीने आच्छादलेला दिसतो. भर दुपारीसुद्धा इथे थंड सावली असते झाडांची!

कमानी घातलेला पदपथ
इथे नागरिकांना बसण्यासाठी पदपथावर छान बांधीव बाक बनवले आहेत. एकावेळेस सात आठ जणांचा समूह समोरासमोर बसून छान गप्पा गोष्टी करू शकेल अशी ही व्यवस्था आहे.या प्रकाशचित्रातला महाविद्यालयीन युवक युवतींचा समूह कदाचित त्यांच्या स्वर्णीम भविष्यकाळाबद्दल चर्चा करत असावा!

समुहाचर्चेसाठी बांधीव बाक
तसेच फक्त दोघांनाच बसून काही चर्चा करायची असेल, अभ्यास अथवा काही काम करायचे असेल तर छोटी बांधीव मेज (table) आणि खुर्च्या असे दोन तीन संचसुद्धा आहेत. पैकी एका मेजावर संगमरवर आणि कडाप्पा वापरून बनवलेला बुद्धीबळाचा पटही आहे, आपण फक्त प्यादी, हत्ती, घोडे आणि उंट आणायचे!

दोघा जणांना चर्चा करता येईल अशा बांधीव मेज आणि खुर्च्या
पदपथावर झाडाची पाने पडल्यासारखे वाटावे अशा प्रकासाराचे ठसेही कॉन्क्रीटवर उमटवले आहेत, ते ही छान दिसतात. 

पदपथावरील पानाचे ठसे
थोडे पुढे गेल्यावर लहान मुलांसाठी बागेत असतात तशी काही खेळणी आहेत. संध्याकाळी इथे लहानग्याची भरपूर गर्दी असते. या भिंगरीवर बसलेला हा युवक कसला विचार करत असेल?

भिंगरी
सी सॉ
या पदपथावर सायकलींसाठी राखीव मार्गिका आहे आणि खुप सारे पुणेकर या मार्गिकेचा वापर करताना दिसले. कोणे एके काळी सायकलींचे शहर अशीच पुण्याची ओळख होती, नाही का?

 पदपथावरील वरीलसायकल मार्गिकेचे चिन्ह
येथील झाडांना पाणी घालण्यासाठीची व्यवस्थाही या सर्वांचा एक भाग आहे. प्लॅस्टिकची नळी जोडताच पाणीपुरवठा सुरू होईल अशी व्यवस्था असलेले खास नळ पदपथावर दिसतात. या नळाला quick release coupling असे म्हणतात आणि या मागची पाईप जोडणी जमिनीखाली दडवलेली असते आणि ती एकंदरीत सुशोभीकरणाला बाधा आणत नाही. 

झाडांना पाणी घालण्यासाठी Q. R. C. पद्धतीचे नळ  
तिथेच बाजूला प्रस्तावित पुणे मेट्रोचा नकाशा आहे ज्यावर नवीन येऊ घातलेल्या पुणे मेट्रोमार्गावरील प्रस्तावित स्थानके दर्शविलेली आहेत. या नकाशात मेट्रोचा कोणता मार्ग जमिनीखाली आहे आणि कोणता जमिनीच्या वर, पुलावर आहे हे वेगवेगळ्या रंगांत दर्शवले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या या चौकातील स्थानकाचे नाव संभाजी उद्यान स्थानक असे आहे. या फलकाचे हे प्रकाशचित्र रात्री काढल्यामुळे त्यावर रस्त्यावरील गाड्यांच्या दिव्यांचे प्रतिबिंब आले आहे आणि त्यामुळे नकाशाचा काही भाग व्यवस्थित दिसत नाहीये. 

पुणे मेट्रोचा नकाशा
या आरामदायक, आल्हाददायी पदभ्रमणानंतर सुप्रसिद्ध संभाजी उद्यानातली सुप्रसिद्ध भेळ आणि पाणीपुरी खाल्लीच पाहिजे, नाही का?

झणझणीत भेळ

चविष्ट पाणी पुरी
पुण्याचे असेच छान सुशोभीकरण व्हावे, मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊन स्मार्ट पुणे ही संज्ञा लवकरात लवकर प्रत्यक्षात यावी ही अपेक्षा ठेवून आहे प्रकाशचित्रणाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

शुभ दिपावली! 

दिवस दोनशे एकोणनव्वदावा पान दोनशे एकोणनव्वदावे 

मुलुंड मुंबई 
१६/१०/२०१७
वसुबारस  









Tuesday 3 October 2017

प्रकाशचित्रणाचा प्रवास: रीळवाला कॅमेरा ते डिजिटल कॅमेरा

Photography ला बहुतेक जण छायाचित्रण म्हणतात परंतु मी प्रकाशचित्रण म्हणणे पसंत करतो. आपण ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची प्रतिमा घेतो, त्यावरून परावर्तित होणार प्रकाश आपण कॅमेरात पकडत असतो. आणि आजच्या डिजिटल प्रकाशचित्रणाच्या काळात ISO नावाचा एक प्रकार असतो तो कॅमेराच्या सेन्सरवर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता दर्शवतो. म्हणून या कलेला प्रकाशचित्रण संबोधणे मला जास्त योग्य वाटतो. 

तर मी हा प्रकाशचित्रणाचा उद्योगलेखनाचा उद्योग चालू करायच्या कितीतरी आधी चालू केला होता. दहावी नंतरच्या सुट्टीत पुण्याच्या सुप्रसिद्ध दाते फोटो स्टुडिओचे मालक श्री दाते यांच्याकडून काही सूचना आणि सल्ले घेतले होते. तेव्हा Magic Eye नावाचा एक साधा box camera वापरला होता.

रीळवाल्या कॅमेरावर प्रकाशचित्रण

या मॅजिक आय कॅमेराच्या आधी बाबांचा Agfa Click III नावाचा असाच एक Fixed Focus Camera होता. 


आग्फा क्लीक ३ कॅमेरा
या दोन्ही कॅमेरात रिळे अर्थात roll असतात ज्यावर प्रकाशचित्र उमटते. आग्फा क्लीक ३ मध्ये १२ प्रकाशचित्रे घेता येतील असे रीळ बसते तर मॅजिक आयमध्ये ३६ प्रकाशचित्रे घेता येतील असे रीळ बसते. या आग्फा क्लीक ३ वर निव्वळ कृष्ण धवल अर्थात black and white प्रकाशचित्रे घेता येतात तर मॅजिक आयवर रंगीत आणि कृष्ण धवल, दोन्ही प्रकारची रीळे वापरता येतात. म्हणजे, एकावेळी या दोन पैकी एकाच प्रकारचे रीळ घालता येते यात! तर श्री दाते यांच्याकडे मी शिकलो तेव्हा या मॅजिक आयमध्ये कृष्ण धवल प्रकारचे रीळ भरले होते. 

त्याआधी या आग्फा क्लीक ३ वर  प्रकाशचित्रे घेणे बाबांकडून शिकलो होतो. या कॅमेराचे वरचे चित्र पाहिलेत तर एक गोष्ट लक्षात येईल की भिंगाजवळ दोन कळा (buttons) आहेत त्यातली गोल कळ आहे टी खाली दाबून कॅमेराची झडप अर्थात shutter उघडून रिळावर प्रकाश पडतो तर दुसरी कळ वर खाली करून भिंगापुढचे छिद्र अर्थात aperture लहान मोठे करता येते.



आग्फा क्लीक ३ कॅमेराची अंतर्गत रचना 
या कॅमेराच्या उजव्या कप्प्यात रीळ भरून ते डाव्या बाजूला ओढून एका खाचेत अडकवायचे आणि दार बंद करायचे असते. वरचे गोल चक्र फिरवून रीळ पुढे ढकलता येतेरिळाच्या मागच्या बाजूला असलेल्या लाल काचे समोर त्या प्रकाशचित्राचा क्रमांक येईपर्यंत वरचे गोल चक्र फिरवावे लागते. हा क्रमांक बरोबर त्या लाल काचे समोर आला तरच पूर्ण प्रकाशचित्र उमटते. हा क्रमांक लाल काचेच्या पुढे गेला तर परत मागे घेण्याची सोय नाहीये. म्हणून हे चक्र काळजीपूर्वक फिरवावे लागते. आणि हे चक्र नाही फिरवले तर एका प्रकाशचित्रावर दुसरे प्रकाशचित्र उमटते म्हणजेच double exposure होते. त्यामुळे हा कॅमेरा काळजीपूर्वक वापरावा लागतो. याच्या एका रीळावर साधारणपणे ५० मि मि X ५० मि मि आकाराची बारा प्रकाशचित्रे घेता येतात. हा कॅमेरा वापरून बाबांनी माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची काही मस्त प्रकाशचित्रे काढली आहेत.


आग्फा क्लिक ३ कॅमेरावर बाबांनी काढलेले प्रकाशचित्र 
हा कॅमेरा वापरून मी स्वतः फार प्रकाशचित्रण केल्याचं माझ्या स्मरणात नाही पण मॅजिक आय कॅमेरा वापरून मी रंगीत आणि कृष्ण धवल, दोन्ही प्रकारची प्रकाशचित्रे काढली आहेत. श्री दाते यांच्या निरीक्षणाखाली काढलेल्या कृष्ण धवल प्रकाशचित्रांपैकी पुण्यातील विठ्ठलवाडी परिसरातले एक प्रकाशचित्र मला आणि श्री दाते यांना खूप आवडले होते, तिथून खऱ्या अर्थाने मी प्रकाशचित्रण सुरू केले असे म्हणता येईल. 

मॅजिक आय हा एक Fixed Focus Camera आहे. म्हणजे याच्या लेन्सची फोकल लेंथ बदलता येत नाही. जवळच्या किंवा लांबच्या वस्तूंची एकसारखीच प्रकाशचित्रे घेतो हा! या कॅमेरात रीळ भरणे आणि प्रकाशचित्र काढून झाल्यावर रीळ पुढे ढकलणे आग्फा क्लीक ३ कॅमेरापेक्षा जरा सोपे आहे. एक प्रकाशचित्र काढून झाल्यानतंर उजवीकडचे दातेरी चक्र फिरवले की रीळ पुढे सरकते आणि पुढच्या प्रकाशचित्राची जागा भिंगासमोर आली की हे दातेरी चक्र फिरायचे थांबते. त्यामुळे double exposure किंवा half exposure हे प्रकार आग्फा क्लीक ३ कॅमेरात होतात ते यात होत नाहीत. 


मॅजिक आय कॅमेराचे controls
वरच्या उजवीकडच्या छोट्या खिडकीत ३६ पैकी किती प्रकाशचित्रे घेऊन झाली आहेत तो क्रमांक दिसतो. वरची गोल चकचकीत कळ दाबली की कॅमेराची झडप उघडून रिळावर प्रकाश पडतो. Flash वापरण्यासाठी त्याला बाहेर सरकवावा लागते. मग तो charge  झाला की Flash Ready हा दिवा लागतो. 


मॅजिक आय कॅमेरा
या कॅमेरालाही भिंगापुढचे छिद्र लहान मोठे करायची सोय आहे. या चित्रात दिसतोय तो weather switch वर खाली करून छिद्र लहान मोठे करता येते. 


सगळी ३६ प्रकाशचित्रे काढन झाली की दातेरी चक्र पुढे जात नाही आणि रीळही पुढे सरकत नाही. मग ते मागे घेण्यासाठी वरचे काळे गोल चक्र, दातेरी चक्र फिरवतो त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावे लागते. वरच्या छोट्या खिडकीत "शून्य" आकडा दिसला म्हणजे सगळे रीळ परत मागे आले आहे हे कळते. असे होण्या आधी कॅमेराचे दार उघडले तर रिळावर बाहेरचा प्रकाश पडून घेतलेली सर्व प्रकाशचित्रे वाया जातात. या कॅमेराला फक्त flash चालवण्यासाठी विद्युत पुरवठा लागतो तो दोन battery cell द्वारे मिळतॊ.


मॅजिक आय कॅमेराची अंतर्गत रचना
हा कॅमेरा वापरून भरपूर प्रकाशचित्रे काढली आहेत. त्यापैकी माझे सर्वात आवडते प्रकाशचित्र हे आहे. 


मॅजिक आय कॅमेरावरचे प्रकाशचित्र

यांच्या काही वर्षांनंतर Olympus Superzoom 105G हा कॅमेरा घेतला. या कॅमेरातही ३६ प्रकाशचित्रे घेता येतील असे रीळ बसते. आधीच्या दोन कॅमेरापेक्षा Olympus मधली वेगळी गोष्ट म्हणजे याला Zoom Lens आहे म्हणजे या भिंगाची Focal Length कमीत कमी ३८ मि मि ते जास्तीत जास्त १०५ मि मि एवढी आहे त्यामुळे लांबच्या आणि जवळच्या गोष्टींचीही चांगली प्रकाशचित्रे घेतो हा कॅमेरा. 


ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेरा


याच्या भिंगाचे झाकण (रिळावर प्रकाश पाडणारी झडप नव्हे) बाजूला सरकवले की ते बाहेर येते आणि हा कॅमेरा प्रकाशचित्रे घेण्यासाठी तयार असतो. 


ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेरा
या कॅमेरातले रीळ एक प्रकाशचित्र काढले की स्वयंचलित प्रकारे पुढे सरकते. याचा मोठा फायदा हा की double exposure किंवा half exposure हे प्रकार होत नाहीत आणि सगळी ३६ प्रकाशचित्रे काढून झाली की सगळे रीळ परत स्वयंचलित प्रकारे मागे येते आणि सुरक्षितरित्या बाहेर काढता येते. या कॅमेराच्या मागच्या बाजूला T आणि W अशी buttons आहेत जी वापरून हवे तसे zoom करता येते, अर्थात focal lengthच्या मर्यादेत राहूनच! वरचा LCD screen ३६ पैकी कितवे प्रकाशचित्र चालू आहे, flash वापरला जातोय का नाही या गोष्टी दाखवतो. तसेच याला self timerही आहे जो वापरून उपस्थित सर्वांचे प्रकाशचित्र काढता येते. 


ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे


ऑलिम्पस सुपर झूम १०५ जी कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे
हा कॅमेरा वापरून भरपूर प्रकाशचित्रण केले होते. पूर्वोत्तर भारताची एक संस्मरणीय सहल या कॅमेरात कैद केली होती.


नमामि ब्रम्हपुत्र: तेजपूर येथील ब्रम्हपुत्रा नदीवरील ३ कि मि लांब पूल

या तिन्ही कॅमेरातली एक सामान गोष्ट म्हणजे कॅमेराच्या भिंगाला जे दृष्य दिसते, जी रिळावर उमटणार आहे, तेच दृष्य प्रकाशचित्रकाराला दिसत नाही. कारण या तिन्ही कॅमेराचे दृष्य शोधक अर्थात view finders वेगळ्या जागी आहेत आणि रिळाचा भिंगासमोर येणारा भाग वेगळ्या जागी! यामुळे या फरकाची सवय होईपर्यंत प्रकाशचित्राचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. flash चालवणे, रीळ पुढे मागे करणे आणि zoom या सर्व गोष्टींसाठी कॅमेराला विद्युत पुरवठा लागतो तो एका battery cell  द्वारे पुरवला जातो.

डिजिटल कॅमेरावर प्रकाशचित्रण


यानंतर बऱ्याच काळाने मी Sony Cyber Shot H 50 हा digital camera घेतला आणि प्रकाशचित्रणाचे एक मोठे क्षेत्र खुले झाले. तुमच्या कॅमेराच्या memory cardची क्षमता ही प्रकाशचित्रे घेण्याची मर्यादा असते digital  photographyमध्येबारा किंवा छत्तीस ही नाही! या कॅमेराने काढलेली खुपसारी प्रकाशचित्रे समाज माध्यमांवर आहेत. हा कॅमेरा वापरून ७ वर्षांत जवळजवळ दहा हजार प्रकाशचित्रे काढली आहेततीही जास्तीकरून या कॅमेराच्या Auto Mode वरच कारण aperture, shutter speed, ISO  या सुवर्ण त्रिकोणाशी ओळख व्हायला जरा वेळ लागला.
 
सोनी कॅमेरा
हा prosumer प्रकाराचा कॅमेरा आहे. Prosumer हा शब्द PROfessional आणि conSUMER या दोन शब्दांच्या मिश्रणातून आला आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा compact point and shoot कॅमेरा आणि SLR (Single Lens Reflex) कॅमेरा या दोन्हीच्या मधला आहे, जो digital photography नव्याने शिकणाऱ्या मंडळींसाठी उपयुक्त आहे. याचे भिंग बदलता येत नाही. आणि एखाद्या SLR कॅमेरासारखीच याची settings आहेत आणि त्या तोडीचीच प्रकाशचित्रे घेता येतात.


दिल्ली आग्रा सहलीत खूप उपयोग केला या कॅमेराचा.



सोनी कॅमेराने काढलेले सर्वात आवडते प्रकाशचित्र 
मग digital photographyचा एक अभ्यासक्रम केला. या अभ्यासक्रमात aperture, shutter speed, ISO  या सुवर्ण त्रिकोणाशी ओळख झाली आणि कॅमेरा Auto Modeच्या बाहेर आला. त्याचबरोबर प्रकाशचित्रांचा दर्जाही सुधारला आणि SLR कॅमेरा घेण्याचे वेध लागले. तरीही या सोनी कॅमेरावरच भरपुर सराव केल्याखेरीज SLR कॅमेरा घ्यायचा नाही हे ठरवले होतेच. आता निकॉन, कॅनॉन का परत सोनी यापैकी कोणता कॅमेरा घ्यायचा यावर खल सुरू झाला. कॅमेरा खरेदीचे budget आणि कॅमेराची settings याचा ताळमेळ बघून Nikon D 5200 हा कॅमेरा साधारण दोन वर्षांपूर्वी घेतला.


निकॉन SLR कॅमेरा
आता aperture, shutter speed, ISO  या सुवर्ण त्रिकोणाशी असलेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले! तरीही SLR कॅमेरा वापरायला एक प्रकारची परिपक्वता लागते ते येण्यासाठी पुन्हा काही अभ्यासक्रम केले, तज्ज्ञ मंडळींबरोबर photo walks आणि कार्यशाळा केल्या, कुठे सहलीला गेलो तर तिथे भरपूर प्रकाशचित्रण केले. आता या Nikon कॅमेरावर हात बसलाय. Manual, Shutter Priority, Aperture Priority, Auto यातला कोणता mode कधी वापरायचा याचे भान आले आहे. जवळजवळ सात हजार प्रकाशचित्रे काढून झाली आहेत या वर आजपर्यँत या कॅमेरावर.

मध्य प्रदेशातील सहलीची हजारपेक्षा जास्त अविस्मरणीय प्रकाशचित्रे कैद केली आहेत यात.


नर्मदा नदीतून दिसणारा महेश्वरचा घाट
प्रकाशचित्रण हा माझा उपजिविकेचा उद्योग नाही. व्यवसायाने मी स्थापत्य अभियंता अर्थात Civil  Engineer आहे आणि प्रकाशचित्रण हा या कामाच्या तणावातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे माझ्यासाठी. या प्रकाशचित्रणाच्या प्रवासात मी आतापर्यंत एकाही स्पर्धेत भाग घेतला नव्हता. परंतु गेल्या महिन्यात पुण्यातील एका संस्थेने पाऊस या विषयावरील प्रकाशचित्रांची एक स्पर्धा आयोजीत केली होती ज्यातील प्रवेशिकांपैकी निवडक प्रकाशचित्रांचे पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शन होते. पहिल्याच प्रयत्नात मी काढलेले प्रकाशचित्र या प्रदर्शनात मांडले होते आणि ही माझ्यासारख्या हौशी प्रकाशचित्रकारासाठी मोठी गोष्ट आहे!


प्रदर्शनात मांडलेले माझे प्रकाशचित्र
लेखनाचा उद्योग या ब्लॉगमधेच खरंतर हा प्रकाशचित्रणाचा उद्योग समाविष्ट होऊ शकला असता पण तसे न करण्याचे कारण आहे. Photography करताना त्यातून एखादी कथा उलगडत आहे किंवा प्रकाशचित्रांना नुसता मथळा देऊन त्याबद्दल पुरेसे भाष्य होत नाहीये आहे असे लक्षात आले तर ती प्रकाशचित्रे थोड्याबहुत वर्णनासह या ब्लॉगवर लिहायचा मानस आहे. 
तेव्हा लवकरच एखाद्या छानशा photo story सह भेटू!

दिवस दोनशे शहात्तरावा पान दोनशे शहात्तरावे.

मुलुंड मुंबई 


०३/१०/२०१७