Saturday 10 February 2018

पुणे मुंबई: भाग १

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग चेडवा दिसतो कसा खंडाल्याचो घाट?  

खंडाळ्याच्या घाटाचं सौंदर्य वर्णन करणारं हे एक अप्रतिम गाणं आहे. मुंबई पुणे प्रवास नियमित करणारा कोणी या घाटाच्या प्रेमात पडला नाही तरच नवल! मग तो प्रवास रेल्वेने असो किंवा रस्त्याने, दोन्ही प्रक्रारे खंडाळ्याच्या अर्थात बोर घाटातला प्रवास आनंददायीच असतो. दर आठवड्याला किंवा कमीतकमी महिन्यातून दोन वेळा मुंबई पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा घाट सवयीचा झाल्यामुळे कदाचित "यात काय विशेष आहे?" असं त्यांना वाटू शकतं पण त्यातही, रेल्वे अथवा रस्त्याने हा प्रवास करणारे काही रसिक या प्रवासात त्यांचे भ्रमणध्वनी अर्थात mobile phone खिशात ठेवून निसर्गाचा आनंद घेताना मी पाहिले आहेत. फक्त खंडाळा घाटच नाही तर संपूर्ण मुंबई पुणे प्रवासात असा निसर्गाचा आंनद घेता येतो. रस्त्याने प्रवास करताना तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर मात्र लक्ष रहदारीवर ठेवणे आवश्यक असते!

बोर घाटात लोहमार्गाच्या तीन मार्गिका म्हणजे tracks आहेत. या पैकी तिसरी मार्गिका माझ्या आठवणीप्रमाणे १९८० च्या दशकात वापरात आली. ही मार्गिका खालील चित्रात दाखवली आहे.

'गुगल अर्थ'कडून साभार

ही मार्गिका सुरुवातीला फक्त मालगाड्यांसाठी (दोन्ही दिशांना प्रवास करणाऱ्या) वापरली जात असे. पण जसजशी प्रवासी वाहतुक वाढू लागली तसा या मार्गिकेचा उपयोग प्रवासी गाड्यांसाठीही होऊ लागला. ज्या डोंगररांगेच्या पुर्वेला मुख्य दोन मार्गिका आहेत त्याच डोंगररांगेच्या पश्चिमेला ही तिसरी मार्गिका आहे. वरील चित्रात लोणावळा, खंडाळा, खोपोली आणि कर्जत ही शहरे दिसत आहेत. तसेच काळ्या रेषा लोहमार्ग दर्शवत आहेत.
मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, दख्खनची राणी अर्थात सर्वांची लाडकी ८५ वर्षांची तरुण Deccan Queen, प्रगती एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या लोकप्रिय गाड्यांपैकी प्रगती एक्सप्रेस या मार्गिकेवरून जाते आणि पुढे कर्जतनंतर कल्याण मार्गे न जाता पनवेल मार्गे मुंबईला जाते ज्यामुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी ठाण्यापर्यंत यायला लागत नाही.
हे माहीत असल्यामुळे याच मार्गाने यायचं म्हणून एकदा पुण्याहून येताना प्रगती एक्सप्रेसने आलो. Internet वर जागेचं आरक्षण करताना खिडकीची जागा मागता येते पण ती मिळेलच याची शाश्वती नसते. या प्रवासात ती मला मिळाली. आता प्रवासाच्या दिशेच्या हिशोबात बोलायचं तर उजव्या बाजूची खिडकी मिळाली असती तर ती डोंगराच्या बाजूला आली असती आणि दृष्टीपथ मर्यादित राहिला असता. पण माझं नशीब थोर म्हणून मला डावीकडची जागा आणि तीही खिडकीतली मिळाली. मग काय? मी आणि माझा कॅमेरा, आणि या संधीचा पूर्ण उपयोग करून घेतला!
खंडाळा स्थानकानंतर २५ क्रमांकाच्या बोगद्यातून गाडी बाहेर आली की सगळ्यात आधी गाडी जाते ती एका छोट्याशा पुलावरून. या पुलाखाली टाटा पॉवरचे जलविद्यूत निर्मितीसाठीचे मोठाले दोन पाईप आहेत. लोणावळा शहराच्या पूर्वेला असलेल्या वळवण धरणातून कालव्यामार्गे येणारे पाणी या ठिकाणी या २४०० मि मि व्यासाच्या २ अजस्त्र pipe मध्ये शिरते. तांत्रिक भाषेत या पाईपला pen stock म्हणतात ज्यातून विद्युत जनित्रावर जोरात पाणी पडते. खोपोलीतलं  हे टाटा पॉवरचं वीज निर्मिती केंद्र मुंबई शहराला वीजपुरवठा करतं. पण या pen stock ची प्रकाशचित्रे घेतली नाहीत कारण माझं लक्ष होतं ते समोर दिसणाऱ्या सुप्रसिद्ध अमृतांजन पुलाकडे! रेल्वेने जाताना या जागेवरून मुंबई पुणे महामार्गावरचा हा १८७ वर्षे जुना पूल लक्ष वेधून घेतोच!
Train मधून दिसणारा अमृतांजन पुल Exif f: 5.6, 1/160 ISO 100
भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीतून या पुलाची प्रकाशचित्रे घ्य्याची असतील तर shutter speed हा १/३०० second किंवा त्यापेक्षा जास्त हवा आणि कॅमेराचा burst mode चालू पाहिजे, म्हणजे आलेल्या खुपसाऱ्या प्रकाशचित्रांपैकी एक दोन चांगली मिळतील. आणि ही सगळी तयारी या २५ क्रमाकांच्या बोगद्यात असतानाच झालेली असली पाहिजे! तसंच लोहमार्गालगतच्या झाडांचा अडथळा टाळून हा पूल कॅमेरात पकडायलाही या settingsचा उपयोग होईल. 

तर या प्रकाशचित्रात जो दगडी खांबांचा पूल दिसतोय तो मूळ अमृतांजन पुल आहे. याचं हे नाव पाडण्याचं कारण म्हणजे या पुलाच्या कमानींच्या वरच्या भागात सुप्रसिद्ध अमृतांजन मलमाचं नाव लोहमार्गावरूनही स्पष्ट दिसेल अशा भल्या थोरल्या अक्षरांत लिहिलं होतं! हो, 'लिहिलं होतं' असंच म्हणावं लागेल. कारण या दगडी पुलाच्या पुढ्यात दिसणारा नवीन concreteचा पुल बांधायच्या कामात कदाचित त्या अक्षरांची अडचण झाली असती किंवा या पुलाचं काम चालू असताना ही अक्षरे अपघाताने रस्त्यावर पडू नयेत म्हणून काढली असतील. शोध घ्यावा लागेल! या पुलावर लोहमार्गाचे reversing station होते. पूर्वी जेव्हा वाफेवर चालणारी इंजिने इथे असलेला अवघड चढ पूर्ण करू शकत नसत, त्यांच्या सोयीसाठी हे reversing station होते. 
Reversing stationचे एक ब्रिटिश कालीन चित्र. सर्व हक्क प्रकाशकाकडे सुरक्षित. 
पुलाच्या बांधकामाच्या वेळचं प्रकाशचित्र. सर्व हक्क प्रकाशकाकडे सुरक्षित.
या पुलाच्या वर लोहमार्ग होता आणि पुलाखाली रस्ता मार्ग, जो अजूनही आहे. नवीन शक्तिशाली रेल्वे इंजिने आल्यापासून या reversing stationचा वापर बंद झाला तरीही हा अमृतांजन पुल या जुन्या आठवणी वागवत डौलाने उभा आहे. पण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणात कदाचित हा पुल तोंडाला जाईल असं बोललं जातंय. तसं झालं तर त्या सारखी दुर्दैवी घटना नसेल!
असो....... 
इथून पुढे गेलं लोहमार्ग अजून एका बोगद्यातून जातो आणि डावीकडे खोपोली शहराचं विहंगम दृष्य दिसतं! अजून थोडं पुढे monkey hill नावाचं एक स्थानक आहे. अर्थात, इथे माकडं खूप दिसतात म्हणूनच हे नाव आहे या स्थानकाला. हा एक तांत्रिक थांबा आहे ज्याला catch siding हे नाव आहे. खंडाळ्याहून कर्जतला जाणारी म्हणजेच उताराच्या दिशेने जाणारी गाडी, तिचे breaks दाबलेल्या अवस्थेत कमीतकमी तीन मिनिटे थांबली पाहिजे. या वेळेआधी गाडीचे breaks सुटले तर गाडी एका चढावावर जाऊन थांबते आणि दुर्घटना टाळते. 
मगाशी आपण ज्या तिसऱ्या मार्गिकेबद्दल बोललो तो या monkey hill नंतर सुरू होते. इथून पुढे कर्जतच्या दिशेने जाताना मुख्य दोन मार्गिका उजवीकडे राहातात आणि ही तिसरी मार्गिका डावीकडे जाते आणि पळसदरी स्थानकाच्या आधी मुख्य मार्गिकांच्या जवळ येते. गुगल अर्थवरून घेतलेल्या चित्रावरून हे लक्षात येईल की या तिसऱ्या मार्गिकेच्या पश्चिम दिशेच्या दरीत खोपोली शहर आहे. तरीही खोपोली शहर इथून पूर्ण दिसत नाही. दिसतात तर खूप सारी लहान लहान खेडी आणि काही वस्त्या. 

अशी छोटी छोटी गावं दिसतात या मार्गावरून Exif: f 8, 1/400, ISO 100
"दूर वो जाने किसका गांव है?" Exif: f 8, 1/400, ISO 100


आणि अशी हिरवाई पाहून मन प्रसन्न झालं नाही तरच नवल! Exif: f:8, 1/400, ISO 100

गाडीचा वेग कमी झाला की मग अशी सुंदर रानफुलं दिसतात Exif f: 8 1/400 ISO 100
आता पळत्या गाडीतून ही प्रकाशचित्रे घ्यायची तर कॅमेराचा shutter speed हा १/३०० second किंवा जास्त हवा. नाहीतर ज्याला motion blur म्हणतात तो परिणाम दिसतो प्रकाशचित्रांत. 

कमी shutter speed  चा परिणाम  Exif:: f: 8 i/30, ISO 100
या प्रकाशचित्रात motion blur हा परिणाम दिसत आहे. shutter speed जास्त असला की image sensorवर उजेड कमी पडतो आणि shutter speed कमी असला की image sensorवर उजेड जास्त पडतो पण हा motion blur परिणाम येतो. तो टाळण्यासाठी shutter speed जास्त ठेवला की प्रकाशचित्र गडद येते. अशावेळी अपेक्षित परिणामासाठी थोडंसं editing करून प्रकाशचित्रातला गडदपणा कमी करता येतो.

तर या तिसऱ्या मार्गिकेचं वैशिष्ट्य असं की दोन बोगद्यांच्यामध्ये गाडी असते तेव्हा ती असते एका पुलावर, कारण इथे लोहमार्ग जातो एका खोल दरीवरून! म्हणजे गाडीचे सुरुवातीचे काही डबे बोगद्यात, मधले डबे पुलावर आणि मागचे डबे पुन्हा बोगद्यात अशी परिस्थिती असते. सह्याद्रीची अशी विविध रूपं या बोर घाटात भरपूर दिसतात आणि दिसतात दूर दूर विखुरलेली आणखी काही गावं. 

दूरवर दिसणारं अजून एक गाव Exif: f:8 1/400 ISO 100
आता घाट संपत असताना मध्येच जर गाडी दुसऱ्या मार्गिकेवर गेली तर तिसरी मार्गिका समोर दिसते. 
दुसऱ्या मार्गिकेवरून दिसणारी तिसरी मार्गिका Exif: f:8 1/400 ISO 100
मग कर्जतला गाडी थांबल्यावर तिथला सुप्रसिद्ध वडापाव न खाणारी व्यक्ती एक तर अरसिक असेल किंवा कडक पथ्यावर तरी असेल! नंतर प्रगती एक्सप्रेस कल्याणच्या दिशेला न जाता पनवेलच्या दिशेने जाते. या मार्गावरचे बोगदे बोर घाटातल्या बोगद्यांपेक्षा जास्त लांब आहेत. एक बोगदा अडीच कि मी पेक्षा जास्त लांब आहे. या बोगद्यांमधून जाताना कॅमेराला काहीच काम नसते!



कर्जत वरून पनवेलला जाणारा मार्ग. 'गुगल अर्थ'वरून साभार
या बोगद्यातून बाहेर आल्यावर उजवीकडे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण दिसतं. पण माझी जागा गाडीच्या डाव्या बाजूला असल्याने या धरणाच्या भिंतीची प्रकाशचित्रे घेता आली नाहीत. तर डावीकडे दिसतो राजा शिवछत्रपती मालकेचं चित्रीकरण झालेला N D Studio


N D Studio मधील एक चित्रीकरण स्थळ Exif: f:9 1/640 ISO 100
या ठिकाणी घाट संपलेला असल्याने गाडीचा वेग जरा जास्त होता. त्यामुळे motion blur टाळण्यासाठी shutter speed १/४०० वरून वाढवून १/६४० second केला होता. मग खूपच गडद आलेलं हे प्रकाशचित्र थोडं संपादित अर्थात edit करून हे असं दिसतं. 

इथे, म्हणजे चौक स्थानकानंतर हा लोहमार्ग मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४ याला काहीसा समांतर जातो. या भागात या महामार्गावरून जाणाऱ्या वहानांची चांगल्यापैकी प्रकाशचित्रे घेता येतात. 

महामार्गावरून जाणारा ट्रक Exif: f:9 1/640 ISO 100

महामार्गावरून जाणारा ट्रक Exif: f:9 1/640 ISO 100

मालवाहक कंपनीचं गोदाम आणि ट्रक उभे करण्याची जागा Exif: f:9 1/400 ISO 100
या तीन प्रकाशचित्रांपैकी पहिल्या दोन प्रकाशचित्रांतल्या ट्रकचा वेग जास्त होता म्हणून कॅमेराचा shutter speedही वाढवला आणि तिसऱ्या प्रकाशचित्रातील ट्रक एका जागी उभे आहेत म्हणून कॅमेराचा shutter speed १/६४० वरून कमी करून १/४०० वर आणला. ज्यामुळे थोडं कमी गडद उमटलं हे प्रकाशचित्र अजून कमी केला असता तर motion blur आलं असतं. 
पुणे मुंबई द्रुतगती मार्गाजवळच्या इमारती Exif: f:5 1/400 ISO 100

हे प्रकाशचित्र घेताना आजूबाजूच्या धुरक्याचा परिणाम कमी व्हावा म्हणून aperture थोडं मोठं केलं पण त्यामुळे हे प्रकाशचित्र जरा जास्तच फिकट आलं. आणि aperture परत छोटं करेपर्यंत गाडी पुढे निघून गेली होती! इथून थोडं पुढे चिखली गावाजवळ लोहमार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जातो. 



या चलचित्रात लोहमार्गाच्या खालचा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग दिसत आहे. गाडीच्या ज्या डब्यात तुम्ही बसलेले असाल तो डबा या पुलावर फक्त ५ ६ second असतो. पुढे उसरली खुर्द या गावाजवळ कोकणातून येणारा लोहमार्ग या कर्जतकडून येणाऱ्या लोहमार्गाजवळ येतो. इतका वेळ आपण प्रवास केला तो कर्जत पनवेल लोहमार्ग एकेरी आहे तर हा कोकणातून येणारा लोहमार्ग रोह्यापासून पनवेल पर्यंत दुहेरी आहे. 
कोकणातून येणारा लोहमार्ग Exif: f:5 1/200 ISO 100
इथे मी बसलो होतो ती प्रगती एक्सप्रेस दुसऱ्या एका गाडीला जागा देण्यासाठी थांबलेली होती. म्हणजे गाडीच्या वेगामुळे motion blur येण्याची शक्यता नव्हती. तरीही shutter  speed १/२०० second इतका जास्त ठेवला होता कारण भरपूर उजेड आणि थोडासा ढगांआडून डोकावणारा सूर्यप्रकाश होता, त्यामुळे image  sensor वर येणाऱ्या उजेडाचे प्रमाण कमी असणे गरजेचे होते नाहीतर प्रकाशचित्र खूपच पांढरे आले असते. 

पनवेलच्या उपनगरी स्थानकातून निघालेली गाडी Exif: f:5.6 1/400 ISO 100 
या प्रकाशचित्रासाठी shutter speed वाढवण्याचं कारण म्हणजे ही उपनगरी गाडी आणि प्रगती एक्सप्रेस, दोघींनी वेगा पकडला होता आणि motion blur टाळणं आवश्यक होत. तर पनवेल मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेच्या trans harbour मार्गावरचं शेवटचं स्थानक आहे. इथे ठाणे, अंधेरी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांपासून उपनगरी रेल्वे सेवा आहे. 

पुढे या लोहमार्गावरील कळंबोली, नवडे, तळोजे, निळजे, दातीवली  या स्थानकांवरून जाऊन दिवा येथे कल्याणकडून येणाऱ्या लोहमार्गाला मिळतो. इथून खारघर इथल्या काही उंच इमारती छान दिसतात. 

खारघर येथील इमारती Exif: f:7.1 1/1000 ISO 100
या प्रकाशचित्रासाठी shutter speed इतका जास्त आणि aperture इतकं छोटं ठेवायचं कारण म्हणजे सूर्य पूर्ण ढगांबाहेर आला होता आणि प्रकाशचित्र पांढरं येणं टाळायचं होतं, जे कमी shutter speed आणि मोठं aperture यामुळे होऊ शकलं असतं. इथे नवी मुंबई मेट्रोचा मार्ग या लोहमार्गाच्या वरून जातो. 


या मार्गावर हा एक लक्षवेधी डोंगर आहे Exif: f:7.1 1/320 ISO 100
कदाचित या डोंगरापाशी एखादी खाण असावी. आता सूर्य परत ढगांमागे लपला होता त्यामुळे उजेड कमी झाला होता म्हणून प्रकाशचित्र  जास्त गडद येऊ नये म्हणून shutter speed पुन्हा कमी केला. 

निळजे स्थानकाजवळील नवीन इमारती Exif: f:7.1 1/800 ISO 100
पुन्हा गाडीचा वाढलेल्या वेगामुळे येणारं motion blur टाळण्यासाठी shutter speed आणखी वाढवला आणि image sensorवर पडणाऱ्या उजेडाचं प्रमाण कमी करण्यासाठी aperture छोटं केलं होतं. 

आता माझं गंतव्य स्थान अर्थात ठाणे स्थानक जवळ आलं होतं. आणि दिवा ते ठाणे या भागात प्रकाशचित्रे घ्यावीत असं काही खास नाहीये. या दोन कारणांमुळे कॅमेरा आवरला. 

गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातला हा जरा वेगळ्या वाटेवरचा पुणे मुंबई प्रवास कॅमेरात पकडता आला आणि असा तुमच्या समोर सादर केला. आशा करतो की तुम्हीही या प्रवासाचा माझ्याबरोबर आणि माझ्याइतकाच आनंद घेतला असेल. 

यावर्षीच्या जानेवारीत केलेला अजून एका वेगळ्या वाटेवरचा पुणे मुंबई प्रवास, काही प्रकाशचित्रे आणि एक भन्नाट चलचित्र अर्थात video घेऊन परत येण्याचं आश्वासन देत आजच्या पुरता हा प्रकाशचित्रणाचा उद्योग थांबवतो. 

दिवस तेहेतीसावा पण तेहेतीसावे. 

मुलुंड मुंबई 
१२/०२/२०१८