Monday 16 October 2017

स्मार्ट पुणे

गेल्या महिन्यात बालगंधर्व कलादालन इथे मी काढलेले एक प्रकाशचित्र प्रदर्शित झाले होते हे वाचकांना आठवत असेलच. त्या प्रदर्शनासाठी मी पुण्यात असताना एकदा संभाजी बागेलगतच्या पदपथावरून जाताना त्या पदपथाच्या सुशोभीकरणाकडे लक्ष गेले आणि त्याची काही प्रकाशचित्रे घेतली. त्या बद्दल थोडेसे.........

पुणे शहराच्या सुशोभीकरणाचे बरेच प्रकल्प चालू आहेत. त्यातला हा एक पूर्ण झालेला प्रकल्प आहे. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या जंगली महाराज रस्त्याकडील प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर डावीकडे डेक्कन जिमखान्याकडे वळले की लगेचच हा सुशोभित पदपथ लक्ष वेधून घेतो. सर्वात प्रथम नजर जाते ती या फलकाकडे ज्यावर या सुशोभीकरणाचे मानचित्र आहे. या चित्रात उजवीकडे संभाजी उद्यानाचे कुंपण दिसते ज्याला धरून हे सुशोभीकरण केले आहे. त्यानंतर जंगली महाराज रास्ता आहे आणि डावीकडे असाच सुशोभित केलेला पदपथ आणि बाजूच्या व्यावसायिक इमारती दिसतात. संभाजी उद्यानाच्या समोरील बाजूचे काम चालू आहे, तर संभाजी उद्याना लगतच्या पदपथाचे काम पूर्ण झाले आहे. 

पदपथ सुशिभिकरणाचे मानचित्र

संपूर्ण पदपथावर नक्षीदार लोखंडी कमानी बसवल्या आहेत. लांबून पाहिले तर संपूर्ण पदपथ या कमानी आणि झाडांच्या सावलीने आच्छादलेला दिसतो. भर दुपारीसुद्धा इथे थंड सावली असते झाडांची!

कमानी घातलेला पदपथ
इथे नागरिकांना बसण्यासाठी पदपथावर छान बांधीव बाक बनवले आहेत. एकावेळेस सात आठ जणांचा समूह समोरासमोर बसून छान गप्पा गोष्टी करू शकेल अशी ही व्यवस्था आहे.या प्रकाशचित्रातला महाविद्यालयीन युवक युवतींचा समूह कदाचित त्यांच्या स्वर्णीम भविष्यकाळाबद्दल चर्चा करत असावा!

समुहाचर्चेसाठी बांधीव बाक
तसेच फक्त दोघांनाच बसून काही चर्चा करायची असेल, अभ्यास अथवा काही काम करायचे असेल तर छोटी बांधीव मेज (table) आणि खुर्च्या असे दोन तीन संचसुद्धा आहेत. पैकी एका मेजावर संगमरवर आणि कडाप्पा वापरून बनवलेला बुद्धीबळाचा पटही आहे, आपण फक्त प्यादी, हत्ती, घोडे आणि उंट आणायचे!

दोघा जणांना चर्चा करता येईल अशा बांधीव मेज आणि खुर्च्या
पदपथावर झाडाची पाने पडल्यासारखे वाटावे अशा प्रकासाराचे ठसेही कॉन्क्रीटवर उमटवले आहेत, ते ही छान दिसतात. 

पदपथावरील पानाचे ठसे
थोडे पुढे गेल्यावर लहान मुलांसाठी बागेत असतात तशी काही खेळणी आहेत. संध्याकाळी इथे लहानग्याची भरपूर गर्दी असते. या भिंगरीवर बसलेला हा युवक कसला विचार करत असेल?

भिंगरी
सी सॉ
या पदपथावर सायकलींसाठी राखीव मार्गिका आहे आणि खुप सारे पुणेकर या मार्गिकेचा वापर करताना दिसले. कोणे एके काळी सायकलींचे शहर अशीच पुण्याची ओळख होती, नाही का?

 पदपथावरील वरीलसायकल मार्गिकेचे चिन्ह
येथील झाडांना पाणी घालण्यासाठीची व्यवस्थाही या सर्वांचा एक भाग आहे. प्लॅस्टिकची नळी जोडताच पाणीपुरवठा सुरू होईल अशी व्यवस्था असलेले खास नळ पदपथावर दिसतात. या नळाला quick release coupling असे म्हणतात आणि या मागची पाईप जोडणी जमिनीखाली दडवलेली असते आणि ती एकंदरीत सुशोभीकरणाला बाधा आणत नाही. 

झाडांना पाणी घालण्यासाठी Q. R. C. पद्धतीचे नळ  
तिथेच बाजूला प्रस्तावित पुणे मेट्रोचा नकाशा आहे ज्यावर नवीन येऊ घातलेल्या पुणे मेट्रोमार्गावरील प्रस्तावित स्थानके दर्शविलेली आहेत. या नकाशात मेट्रोचा कोणता मार्ग जमिनीखाली आहे आणि कोणता जमिनीच्या वर, पुलावर आहे हे वेगवेगळ्या रंगांत दर्शवले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या या चौकातील स्थानकाचे नाव संभाजी उद्यान स्थानक असे आहे. या फलकाचे हे प्रकाशचित्र रात्री काढल्यामुळे त्यावर रस्त्यावरील गाड्यांच्या दिव्यांचे प्रतिबिंब आले आहे आणि त्यामुळे नकाशाचा काही भाग व्यवस्थित दिसत नाहीये. 

पुणे मेट्रोचा नकाशा
या आरामदायक, आल्हाददायी पदभ्रमणानंतर सुप्रसिद्ध संभाजी उद्यानातली सुप्रसिद्ध भेळ आणि पाणीपुरी खाल्लीच पाहिजे, नाही का?

झणझणीत भेळ

चविष्ट पाणी पुरी
पुण्याचे असेच छान सुशोभीकरण व्हावे, मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊन स्मार्ट पुणे ही संज्ञा लवकरात लवकर प्रत्यक्षात यावी ही अपेक्षा ठेवून आहे प्रकाशचित्रणाचा उद्योग आजच्यापुरता थांबवतो. 

शुभ दिपावली! 

दिवस दोनशे एकोणनव्वदावा पान दोनशे एकोणनव्वदावे 

मुलुंड मुंबई 
१६/१०/२०१७
वसुबारस  









3 comments: